,

तडफदार बाळ टिळक

Thursday, December 31, 2009 Leave a Comment


बालमित्रांनो, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म १८५६ साली रत्नागिरीतील चिखली या गावी झाला. `स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' या त्यांच्या सुपरिचित वाक्यामुळे आपण त्यांना `लोकमान्य' म्हणून ओळखतो; परंतु टिळकांची वृत्ती लहानपणापासूनच निर्भयी आणि बाणेदार कशी होती, ते आज या गोष्टीतून आपण समजून घेऊया.

बाळचे वडील गंगाधरशास्त्री हे संस्कृतचे पंडित होते. लहानपणापासूनच आपल्या वडिलांकडून बाळ संस्कृतचे पाठ घेऊ लागला. बाळ रत्नागिरी येथील प्राथमिक शाळेत शिकत होता. एक दिवस गणित हा विषय चालू होता. गुरुजींनी प्रश्न विचारला, ``पाच बकऱ्या एक कुरण २८ दिवसांत खातात, तर तेच कुरण २० दिवसांत किती बकऱ्या संपवतील ?'' त्वरित उत्तर आले, ``सात बकऱ्या.'' गुरुजींचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच उत्तर कोणी दिले म्हणून गुरुजी बघू लागले. गुरुजींनी बाळला विचारले, ``तू उदाहरण वहीत सोडवले आहेस का ?'' बाळने आपल्या तर्जनीने डोक्याकडे निर्देश केला. टिळकांच्या बुद्धीप्रगल्भतेची ओळख आपल्याला या छोट्याशा प्रसंगातून होते.

बुद्धीमान बाळ तितकाच तडफदारही होता. एके दिवशी मधल्या सुटीनंतर गुरुजींनी वर्गात प्रवेश केला. सर्व मुले उठून उभी राहिली. वर्गात सर्वत्र शेंगदाण्यांची टरफले इकडे तिकडे पसरलेली असल्याने वर्गात आल्याआल्याच
गुरुजींचा पारा चढला. गुरुजींनी विचारले, ``सांगा, शेंगदाणे कोणी खाल्ले ?'' वर्गात सर्वत्र शांतता पसरली. कोणीही काही बोलावयास सिद्ध होईना. हे पाहून गुरुजींच्या रागाचा पारा आणखीनच चढला. कोणीही बोलत नाही, असे पाहून गुरुजींनी सर्वांनाच शिक्षा करायचे ठरवले. गुरुजींनी पटलावरची वेताची छडी उचलली आणि प्रत्येक मुलाच्या जवळ जाऊन त्याच्या हातावर दोन-दोन छड्या देण्यास प्रारंभ केला.

गुरुजी बाळजवळ आले; परंतु बाळने आपला हात पुढे केलाच नाही. बाळ हात पुढे करत नाही, हे पाहून गुरुजींनी त्याला हात पुढे करावयास सांगितले. बाळ दृढतेने म्हणाला, ``मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी छडी घेणार
नाही.'' ``मग शेंगा कोणी खाल्ल्या ?'', असा प्रश्न गुरुजींनी विचारला. बाळ म्हणाला, ``मी चुगली करणार नाही. चुगली करणे वाईट आहे.''

बाळच्या या स्पष्टवक्तेपणामुळे गुरुजी अस्वस्थ झाले आणि चिडलेही. त्यांनी बाळला वर्गाबाहेर जाण्यास सांगितले आणि बाळचे गंगाधरशास्त्री यांच्याकडे गाऱ्हाणे केले. दुसऱ्या दिवशी गंगाधरशास्त्री शाळेत आले. गंगाधरपंत गुरुजींना म्हणाले, ``माझा मुलगा जे म्हणाला, ते सत्य आहे. त्यास बाहेरची वस्तू खाण्याची सवय नाही. त्यासाठी मी त्यास पैसे देत नाही.'' आपल्या बाळविषयी त्यांना पूर्ण निश्चिती होती.

टिळकांच्या बाणेदार वृत्तीचा प्रत्यय आपल्याला या त्यांच्या लहानपणीच्या प्रसंगावरून येतो. याच निर्भय वृत्तीमुळे ते पुढे स्वातंत्र्याच्या चळवळीत बहुमोल कामगिरी करू शकले आणि एक असाधारण देशभक्त म्हणून प्रसिद्ध झाले.

मित्रांनो, आपल्यामध्येही अशी निर्भयी वृत्ती आली पाहिजे. साधनेने अशी वृत्ती आपल्यात येते. लोकमान्य टिळकांची देशभक्तीची साधना होती, हिंदु धर्मावर त्यांचा गाढ विश्वास होता. मंडालेच्या तुरुंगात त्यांच्याकडून `गीतारहस्य' या महान ग्रंथाची रचना झालीी. आपणही साधना करून निर्भय, बलवान होऊन दुष्टांचा अन्याय मोडून काढूया.

0 comments »